Thursday, 5 January 2017

                                                नव वर्ष

          नवीन वर्ष म्हणजे असते काय नक्की? खरंच असं काही नवीन असते का ? की फक्त बदल असतो एका तारखेचा, काही कॅलेंडर्सचा. बाकी सारं काही आहे तसंच वर्षानुवर्ष तारखेसोबत माणसेही बदलतात का ? माणसे बदलतात की त्यांचे स्वभाव ? की त्यांचा प्राधान्यक्रम ? आपण स्वतःही बदलत असू का ? बदल हा स्थिर असतो म्हणतात, माणसांच्या मनालाही हा नियम लागू होतो का ? चवीत बदल हवा हा मानवजातींचा गुणधर्म असेल तर चवीच्या रांगेत माणसेही गणली जावीत का ? माणूस म्हणजे मीठ किंवा साखर नाही ना, नेहमी एकच चव द्यायला. परिस्थितीमुळे माणूस बदलतो असे म्हणतात. मग परिस्थिती कोणामुळे तयार होते ? बदललेल्या माणसांमुळे तर नाही ना ?
          नवीन वर्ष विशेष असं काय आणते आपल्या आयुष्यात ? नवीन माणसे जुन्या माणसांची जागा घ्यायला तर नाही ना ? शेवटी काय बदलत्या माणसांचा खेळ सगळा. आज जे लोक सोबत आहेत ते उद्या बदलणार आहेत, त्यांची जागा दुसरं कोणीतरी घेणार आहे. हाच खरा बदलाचा नियम.

 - समता हेमा अनिल जगताप

Tuesday, 3 January 2017

नवीन वर्षातला नवा संकल्प

क्रांतीज्योती, स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. नव्या सालातला नवा सण. अर्थात सावित्री उत्सव. बऱ्याच दिवसांपासून माझे काही शिक्षक, मित्र-मैत्रिणी, हितचिंतक मला एक सल्ला वारंवार देत होते. तो सल्ला मी यावर्षीचा संकल्प म्हणून आजपासून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करतेय. तो म्हणजे ब्लॉग लिहिण्याचा. अर्थात मला स्वतःला देखील प्रेरणा मिळाल्याने मी हा निर्णय घेतला आहे. 'स.जग' या नावाने मी हा ब्लॉग आजपासून सुरु करत आहे. जे जे मनात येईल, जे काही समाजोपयोगी असेल ते आपल्यासमोर मांडत जाईन, आपण त्याचं स्वागत कराल अशी आशा व्यक्त करते. ज्या सावित्रीमुळे मी हे लिहू शकले, शिक्षण घेऊ शकले त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून मी हे पाऊल उचलण्याचं धाडस केलं आहे.
आजच्या दिवशी मला विद्रोही शाहीर शीतल साठे यांच्या एका गाण्यातील ओळी आठवतात :
"ज्याेत लावलीस साऊ, वणवा मी ही पेटवीन,
तू जे शिल्प कोरलेस, ते मी बोलके करीन..."